सातारा जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत
आपले स्वागत आहे...
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. क्रीडा ही मानवास प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. काही जण थेट स्वरूपात तर काही जण सहाय्य करण्याच्या भूमिकेतून या क्षेत्रांशी निगडित असतात.
सातारा जिल्हा हा स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व शूरवीरांचा जिल्हा आहे. अशा या सातारा जिल्ह्याला खेळाचा फार मोठा इतिहास असून, स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक कास्य पदक मिळवून देणारे स्व.पै. खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्याचे. त्याचप्रमाणे सर्वात कमी वयामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ गटातील जागतिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करुन, भारत देशातील खेळामधील राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेती कु. आदिती स्वामी ही पण सातारा जिल्ह्याची खेळाडू. तसेच ललिता बाबर, प्रविण जाधव यांच्यासारखे ऑलिम्पिक खेळाडू सातारा जिल्ह्यातील असून, अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले खेळाडू या सातारा जिल्ह्यात आहेत. विविध खेळाच्या सरावाकरिता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा प्रमाणे जिल्ह्यातील सातारा, कराड, माण, खटाव, फलटण या तालुक्यामध्ये क्रीडा सुविधा विकसित करण्यात आलेल्या असून, उर्वरित तालुक्यामध्ये क्रीडा सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरु आहे. राष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य संपादन करणा-या खेळाडूंना शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार सन २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामधील एकूण १०२ खेळाडूंना रुपये ७,४९,२००/- शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल वयोवृध्द खेळाडूंना मानधन देण्याची योजना कार्यान्वित असून, सातारा जिल्ह्यातील एकूण १३ खेळाडूंना वयोवृध्द खेळाडू मासिक मानधन वितरित करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तर, जिल्हास्तरावरील विविध खेळांमध्ये सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळा/महाविद्यालयांच्या एकूण ७१,०१०/- खेळाडू मुल-मुलींनी सहभाग घेतलेला होता. त्याचप्रमाणे विभागस्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे व राज्यस्तरावरील एकूण ०२ खेळांच्या क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या खेळाडूंची निवास, भोजन इ. व्यवस्था जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते. सातारा जिल्हा हा आज खेळामध्ये अग्रेसर होत असून, अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उच्चत्तम कामगिरी करणारे खेळाडू हे सातारा जिल्ह्याचे खेळाडू आहेत. अशा या खेळाडूंना व उद्योन्मुख खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहमी प्रयत्न करित असून, यापूढे ही प्रयत्न करित राहील. सर्व खेळाडू, क्रीडा विभाग प्रमुख, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी यांना त्यांच्या पूढील वाटचालीकरिता हार्दिक शूभेच्छा!